अकाेला : अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना ५ कोटींची खंडणी व मुलाला तसेच परिवाराला संपविण्याच्या धमकीच्या पत्र प्रकरणात तीन संशयितांना नाेटीस बजावण्यात आल्या आहेत. या पत्रातील हस्ताक्षर तपासण्यात येणार असून संशयितांमध्ये दर्यापुरातील राजकीय व्यक्तींचा समावेश असून त्यामध्ये माजी नगराध्यक्ष, मनसे तालुका प्रमुख, नगर परिषद बांधकाम सभापती यांचे पती अशा तिघांना दर्यापूर पोलिसांमार्फत नोटीस बजावण्यात आल्याचे एपीआय सचिन जाधव यांनी सांगितले.
आमदार भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील शिवाजीनगर निवासस्थानी २० फेब्रुवारी रोजी टपालाद्वारे एक निनावी पाकीटबंद पत्र प्राप्त झाले होते. ते पत्र भारसाकळे यांचे स्वीय सहायक सुधाकर हातेकर यांनी बघितले असता त्यामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत पाच कोटींची खंडणी द्यावी अन्यथा आमदार भारसाकळे यांचा मुलगा विजय व कुटुंबीयांना अपघातात मारून टाकू अन्यथा गोळी मारू असे हिंदी भाषेतून मजकूर लिहून धमकावले होते. या प्रकरणाची तक्रार सुधाकर हातेकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी दर्यापूर ठाण्यात दाखल केली होती. त्यावर आमदार भारसाकळे यांच्या बयाणावरून तिघांविरुद्ध संशय असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या पत्राच्या हस्तक्षर तपासणीकरिता संशयित आरोपींमध्ये माजी नगराध्यक्ष, मनसे तालुका प्रमुख तसेच नगर परिषद बांधकाम सभापती यांचे पती अशा तिघांना दर्यापूर पोलिसांमार्फत नोटीस बजावण्यात आल्याचे एपीआय सचिन जाधव यांनी सांगितले.