अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना सातही तहसीलदारांनी मंगळवारी जाहीर केली. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, निवडणुकीच्या कामाची जबाबदारी चोख पार पाडण्याचे निर्देश दिले.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची अधिसूचना १५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तहसीलदारांनी जाहीर केली. तहसील कार्यालये, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकणी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामाची जबाबदारी चोख बजावण्याचे निर्देश दिले. निवडणुकीच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही, यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
५९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक!
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सातही तहसीलदारांकडून ५९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये नायब तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी आदी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयुक्त
आज घेणार आढावा
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामाचा जिल्हानिहाय आढावा राज्य निवडणूक आयुक्त बुधवार, १६ डिसेंबर रोजी ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’द्वारे घेणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामाचा आढावा राज्य निवडणूक आयुक्तांकडून घेण्यात येणार आहे.