दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई, गांजा, दारू व तलवार जप्त
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरून येथून गांजाची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास दहशतवादविरोधी कक्षाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
हातरून येथील शेख जुनेद शेख मुख्तार हा त्याच्या राहत्या घरातून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह छापा टाकून शेख जुनेद शेख मुक्तार याच्याकडून पाच किलो गांजा किंमत पन्नास हजार रुपये, गांजा विक्री केलेले २१ हजार रुपये रोख, देशी दारूच्या १०० बॉटल व एक तलवार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल दहशतवाद विरोधी कक्षाने जप्त केला. सदर आरोपी अमली पदार्थांसह देशी व विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तत्कालीन ठाणेदारावर केला होता हल्ला
उरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार बुधवंत यांच्यावर शेख जुनेद शेख मुख्तार याच्यासह त्याच्या भावांनी प्राणघातक हल्ला केला होता. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणेदार बुधवंत यांच्यावर प्राणघातक हल्ल केला होता. या हल्ल्यात ठाणेदार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतरही या आरोपींची मुजोरी कायम असून अवैध धंदे सुसाट करीत असल्याचे दहशतवाद विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे.