अकोला: सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वसाहत येथील रहीवासी तसेच कुख्यात गुंड शुभम संजय गवइ वय २९ वर्ष यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानंतर शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे अस्त्र उगारले आहे.
मध्यवर्ती बसस्थानक चौक परिसरातील रहिवासी तसेच कुख्यात गुंड शुभम संजय गवइ वय २९ वर्ष हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे,जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयंभग करणे, मुलींना त्रास देणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजीत कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.
त्यानंतर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलीस उपअधीक्षक सतीष कुळकर्णी, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे गोपाल जाधव, आशीष शिंदे, सिटी कोतवालीचे ठाणेदार सुनील वायदंडे, ज्ञानेश्वर सैरीसे, उदय शुक्ला, माजीद पठान, चंद्रकांत ठोंबरे व पोलिसांनी केली.