अकोला : आकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकर नगर येथील रहीवासी तसेच कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे वय ३० वर्ष यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे अस्त्र उगारले असून ११ वी एमपीडीए कारवाइ करण्यात आली आहे़.
शंकर नगरातील रहीवासी कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे वय ३० वर्ष वर्ष हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे,जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, दंगा करणे, शांतता भंग घडवून आणणे, नुकसान करणे, दुखापत पाेहाेचविणे, प्राणघातक हल्ला चढविणे, अवैध व बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघण करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलीस उपअधीक्षक सतीष कुळकर्णी, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई आशीष शिंदे, ज्ञानेश्वर सैरीसे, उदय शुक्ला आकाेट फैलचे ठाणेदार चंद्रशेखर कडू, कर्मचारी देवीदास फुलउंबरकर व पोलिसांनी केली.