अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वसाहत येथील रहिवासी कुख्यात गुंड अनिल उत्तम रताळ याची गुन्हेगारी प्रवृत्ती सुधारत नसल्याने त्याला जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये एक वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या प्रस्तावावरून एमपीडीए अंतर्गत कारवाई करून अनिल रताळ यास स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिली.
इराणी वसाहत येथील रहिवासी कुख्यात गुंड अनिल उत्तम रताळ याच्याविरुद्ध खंडणी मागणे, चोरी करणे, प्राणघातक हल्ला करणे, घरफोडी करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अनिल रताळ याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आहे; मात्र तो कशालाही जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत एक वर्ष मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी या प्रस्तावातील माहिती सूत्रांकडून खरी आहे किंवा खोटी आहे यासंदर्भात पडताळणी केल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी गुंड अनिल रताळ यास एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध केले. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, मंगेश महल्ले, मंगेश मदनकार,विजय गुल्हाने यांनी केली.