अकोला: कोरोनाच्या कारणामुळे देशभर ‘लॉकडाउन’ असताना दहीगाव, सांगळूद, धोतर्डी, आपातापा परिसरातील ग्रामस्थांना पोलीस असल्याचे सांगून रात्री विनाकारण मारहाण करणाऱ्या कुख्यात गुंड अज्जू ठाकूर व किरण पांडे यांच्या टोळीविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी ताब्यात घेतले. त्यानंतर जठारपेठ परिसरात दहशत करणाºया अज्जू ठाकूर व किरण पांडेची रस्त्यावरून वरात काढत सामान्य नागरिकांच्या मनात असलेली या दोघांची भीती संपविण्याचे काम पोलिसांनी शनिवारी केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांचा वचक या गुंडांवर निर्माण झाला आहे.जठारपेठ परिसरातील रहिवासी अज्जू ठाकूर तसेच किरण पांडे यांच्यासह आणखी काही गुंड प्रवृत्तीचे युवक ग्रामीण भागातील निरपराध ग्रामस्थांना विनाकारण मारहाण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व पोलिसांना मिळाली; मात्र पोलिसांच्या हातात हे गुंड लागत नसल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच जागरूक करीत त्यांच्या व्हिडिओ तसेच छायाचित्र काढण्यास सांगितले. यावरून अज्जू ठाकूर, किरण पांडे व त्याचे साथीदार तीन दिवसांपूर्वी धोतर्डी तसेच सांगळूद येथील ग्रामस्थांना पोलीस असल्याचे सांगत मारहाण करण्यासाठी जाताच येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडले व पोलिसांना माहिती दिली; मात्र पोलीस येईपर्यंत हे दोघेही ग्रामस्थांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. या प्रकरणाची तक्रार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला; मात्र ते फरार झाले होते. दरम्यान, हे दोन्ही आरोपी शनिवारी अकोल्यात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्याचे पथक या परिसरात गेले आणि त्यांनी अज्जू ठाकूर व किरण पांडे या दोघांनाही ताब्यात घेतले. जठारपेठ परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत करीत असल्याने याच परिसरात त्यांची वरात काढून सामान्यांमध्ये असलेली भीती संपविण्याचे काम पोलिसांनी शनिवारी केले. त्यानंतर या दोन्ही आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.