हेंडज येथील रहिवासी कुख्यात गुंड सागर अजाबराव साेळंके, वय २७ वर्षे हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, मूर्तिजापूरचे उपविभागीय पाेलीस अधिकारी संताेष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, मूर्तिजापूर ग्रामीण पाेलीस स्टेशनचे सहायक पाेलीस निरीक्षक आऱ.जी. शेख, मंगेश महल्ले यांनी केली.
मूर्तिजापूर येथील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:16 AM