विवेक चांदूरकर अकोला : वृक्षांची होत असलेली कत्तल व वन्य प्राण्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी आता वनविभाग सरसावले आहे. राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या जंगलांवर आता आठवड्यातील २४ तास वनकर्मचारी व अधिकार्यांचा वॉच राहणार आहे. जंगलांची होत असलेली तोड, व त्याचे दिसणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविधि उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्येच राज्यातील सर्वच जंगल आता अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. पूर्वी वनाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधरण क्षेत्र, संवेदनशील व अतिसंवेदनशील क्षेत्र असे तीन प्रकार होते. आता सर्वसाधारण क्षेत्र व संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात आले असून, सर्वच क्षेत्र अतिसंवेदनशील करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधीत वनविभागाच्या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच वन कर्मचारी व अधिकार्यांच्या जबाबदार्याही वाढल्या आहेत. पूर्वी सर्वसाधारण व संवेदनशील क्षेत्र असलेल्या कर्मचार्यांवर जास्त ताण नव्हता. आता मात्र, बिट गार्डला दररोज बीट निरीक्षण करून नोंदी कराव्या लागतील. तसेच दैनंदिनीही प्रलंबित ठेवता येणार नाही. वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकार्यांना साहाप्तीक दैनंदिनी व वनसंरक्षकांना मासिक दैनंदिनी न चुकता सादर करावी लागणार आहे. सर्वच जंगलांच्या सीमा आखून, त्यावर खुणा करून त्या मजबुत कराव्या लागणार आहे. अतिसंवेदनशील जंगल अखत्यारित असलेल्या वन व वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील उपवनसंरक्षकापासून तर बिट गार्डपर्यंत सर्वांच्याच जबाबदार्या वाढल्या आहेत. ** बिट गार्ड, वनकर्मचारी नेहमीच गस्तीवर सर्वच जंगले अतिसंवेदनशील झाल्यामुळे आता बिट गार्ड व वन कर्मचार्यांना नेहमीच गस्तीवर राहावे लागणार आहे. आपल्या अखत्यारित असलेल्या जंगलात येणार्या जाणार्यांच्या नोंदी घेणे, जंगल परिसराची नियमित पाहणी करून त्याचा दैनंदिन अहवालही त्यांना सादर करावा लागणार आहे.
आता राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील
By admin | Published: September 13, 2014 1:22 AM