लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची बचत करणार्या ‘एलईडी’ बल्ब वितरण योजनेला लोकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आता ऊर्जा-कार्यक्षम पंखे बाजारात आणले आहेत. मुंबईतून या योजनेला सुरुवात झाल्यानंतर ‘ईईएसएल’ने अकोल्यात प्रायोगिक तत्त्वावर या पंख्यांचे वितरण बुधवारपासून सुरू केले. ४५ वॉट क्षमतेचा असलेला हा पंखा ‘फाईव्ह स्टार’ रेटिंगचा असून, तो केवळ १२00 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.ईईएसएल या कंपनीने महाराष्ट्रात जुलै २0१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना महावितरणच्या सहाय्याने सुरू केली होती. या ‘उजाला’ योजनेंतर्गत सुरुवातीला सात वॅट, तर नंतर नऊ वॅटचे एलईडी बल्ब आणि त्यानंतर २0 वॅटचे एलईडी ट्यूबलाइट बाजारात आणले. उज्रेची बचत करणारे दिवे वितरित करण्याची योजना यशस्वी झाल्यानंतर कंपनीने ऊर्जा-कार्यक्षम पंखे आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे ठेवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर, मुंबई येथे हे पंखे वितरित करण्याच्या योजनेला गत महिन्यात सुरुवात झाली. आता प्रायोगिक तत्त्वावर अकोल्यातही ही योजना सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर थाटलेल्या एलईडी बल्ब विक्रीच्या स्टॉलमध्ये हे ऊर्जा-कार्यक्षम पंखे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
स्वस्त आणि उज्रेची बचत करणारा पंखा सामान्य पंखे ९0 ते १00 वॅटचे असतात, त्यामुळे त्यांना जास्त वीज लागते; परंतु ईईएसलचा हा ४५ वॅटचा असल्यामुळे विजेची बचत होते. ईईएसलने आणलेला ऊर्जा कार्यक्षम पंखा हा फाइव्ह स्टार रेटिंगचा आहे. साधारणपणे अशा पंख्यांची बाजारातील किंमत १८00 रुपयांपर्यंत असते; परंतु ईईएसलच्या स्टॉलवर हे पंखे १२00 रुपयांमध्ये विकले जात आहेत. नागरिकांनी ईईएसलच्या स्टॉलवरील अधिकृत पंखेच घ्यावे, असे ईईएसलचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी सांगितले.