- राजरत्न शिरसाट
अकोला: अगोदरच पिके किडींनी पोखरली असताना आता नव्याने ‘बहुभक्ष्यीय उपद्रवी (टोळधाड) कीड वाळवंटी टोळ’चा धोका निर्माण झाला असून, सद्यस्थितीत राजस्थान व गुजरात राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यात या किडीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. ही टोळधाड संपूर्ण पीक उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या राज्यात सहसा ही कीड येत नाही व सध्या आली नाही, असे असले तरी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी राज्याच्या कृषी यंत्रणेला दिला आहे.१९२६ मध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर १९३१, ४९, ५५, ७८ च १९९३ मध्ये सुद्धा देशात या किडीने थैमान घातले होते. वाळवंटी टोळ किंवा नाकतोड असे या किडीचे शास्त्रीय नाव आहे. पुरातन काळापासून ही कीड अस्तित्वात आहे. संस्कृत वाङ्मयात इ.स. पूर्वी ४०० वर्षांमध्येसुद्धा या किडीचा उल्लेख आढळून आला असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी दिली.वाळवंटी कीड ही मोठ्या प्रमाणात पिके व वनस्पती, झाडाझुडुपांचे नुकसान करते. एकटी व समूह असे या किडीचे दोन प्रकार आहेत. यातील समूह अवस्थेतील कीड पिकाचे प्रचंड नुकसान करते. या किडीचा थव्यामध्ये १० हत्ती, २५ उंट किंवा २,५०० माणसे खातील एवढे अन्न एका दिवसात फस्त करण्याची क्षमता आहे. म्हणूनच या किडीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येते. ही कीड प्रादुर्भावग्रस्त देशामध्ये लक्ष ठेवण्यासाठी टोळ संरक्षण यंत्रणा उभारलेली आहे. भारतातील राजस्थान व गुजरात राज्यातील वाळवंटी भागातील यंत्रणा या किडीवर वर्षभर लक्ष ठेवून असते. यासाठी नियमित सर्वेक्षण केले जाते. किडीची संख्या आर्थिक नुकसानाच्या पातळीवर म्हणजेच प्रतिहेक्टर १० हजार प्रौढ किडे किंवा पाच ते सहा प्रतिझुडूप आढळून आल्यास टोळ प्रतिबंधक यंत्रणा राज्याला सजग करू न नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहने व रासायनिक कीटकनाशके उपलब्ध करू न दिली जातात. दरम्यान, केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने या किडीच्या व्यवस्थापनासाठी कुठल्याही कीटकनाशकांची शिफारस केलेली नाही. या टोळ किडीचा शेतात प्रवेश होऊ नये म्हणून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे, तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे आदींचा समावेश करण्यात आला असल्याचे डॉ. उंदिरवाडे यांनी सांगितले.