- अतुल जयस्वालअकोला : कोरोना संसर्गावर ‘प्लाझ्मा थेरपी’ उपयुक्त ठरत असून, या उपचार पद्धतीसाठी आवश्यक असलेला प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आता ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’अंतर्गत प्रत्येक प्लाझ्मा दात्याला आता २००० रुपये देण्यात येणार आहेत. पूर्वी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती; परंतु कित्येक दात्यांना ही रक्कम मिळालीच नव्हती. आता यासाठी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना निधी वितरित करण्यात आला असून, तसे परिपत्रक १७ आॅगस्ट रोजी काढण्यात आले आहे. यापूर्वी प्लाझ्मा दान केलेल्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.कोरोनावर कोणतीही ठोस उपचार पद्धती नाही. जे रुग्ण इतर औषधांना प्रतिसाद देत नाहीत किंवा ज्यांना आॅक्सिजनची गरज अधिक असते, अशा रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’ ही उपचार पद्धती वापरली जात आहे. यासाठी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक वापरला जातो. तथापि, यासाठी कोरोनातून बरे झालेल्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. ‘प्लाझ्मा थेरपी’ला चालना देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत जुलै महिन्यात नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘प्रोजेक्ट प्लॅटीना’ सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा युनिट स्थापन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून यापूर्वी ५०० रुपये प्रति डोनर अशी तरतूद करण्यात आली होती; परंतु राज्यभरात कुठेही याची अंमलबजावणी झाली नव्हती. प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे दात्याचा संपूर्ण दिवस खर्ची पडतो. यामुळे प्लाझ्मा दानासाठी कोणी फारसे पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. प्लाझ्मा दान करणाºयाला त्याने खर्च केलेले किमान प्रवास भाडे, जेवन व त्याच्या बुडालेल्या रोजगाराचा मोबदला मिळावा, यासाठी आता प्रत्येक दात्याला २००० रुपये देण्यात येणार आहेत. अकोला जीएमसीमध्ये आतापर्यंंत १५ जणांकडून प्लाझ्मा संकलीत करण्यात आला आहे; परंतु यापैकी कोणालाही प्रोत्साहनपर २००० रुपये प्राप्त झाले नव्हते. आता शासनाकडून परिपत्रक जारी झाल्यानंतर या १५ जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.२७३ दात्यांकडून ७७५ युनिट प्लाझ्मा संकलीतप्लॅटिना प्रोजेक्ट अंतर्गत १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २७३ रक्तदात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. २३ आॅगस्टपर्यंत या रक्तदात्यांनी ७७५ युनिट प्लाझ्मा दान केल्याची नोंद आहे.प्लॅटिना प्रोजेक्ट अंतर्गत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास २० दात्यांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत अकोल्यात १५ जणांनी प्लाझ्मा दान केला असून, त्यांना लवकरच प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.