अकोला- सन २०१७ पासून मंजूर झालेल्या विहिरींचे अद्यापही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यांचे अनुदान त्वरित मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला विहीर’ योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केली. अकोला शहरातील खंडेलवाल भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच त्यांनी जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासनही दिले.
राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेना (शिंदे गट) मार्फत आयोजित हिंदुगर्वगर्जना संपर्कयात्रेनिमित्त अकोल्यात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात रोहयोअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विहिरींचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामध्ये विविध कागतपत्रांची पुर्तता करावी लागते. मात्र ज्या शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ हवा आहे, त्यांना आता विहिरींचा लाभ त्वरित देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे भुमरे यांनी सांगितले. पूर्वी विहिरीसाठी ३ लाखांचे अनुदान मिळत होते. आता ते अनुदान वाढवून ४ लाख केले, तसेच शेतकऱ्यांना अडचणींच्या ठरणाऱ्या जाचक अटीही शिथिल केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात अनेक सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असून, आताचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम करीत असल्याचे राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले. या प्रसंगी माजी मंत्री अर्जून खोतकर, माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन योगेश अग्रवाल यांनी केले, तर प्रास्ताविक विठ्ठल सरप यांनी केले. कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये राज्यात ७५ हजार पदांसाठी नोकर भरती -राज्यातील विविध विभागांमध्ये जवळपास १.५० लाख पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांवर ताण येत आहेत. यावर्षी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने राज्यभरात आता ७५ हजार पदांसाठी नोकर भरती राबविण्यात येणार असल्याची माहिती रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आता यापूढे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासासह शिवशाहीचा प्रवासही मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.