लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारे टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्या ऐवजी आता धनुर्वातासह घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. गत काही वर्षांपासून १० आणि १६ वर्षाच्या प्रौढांमध्ये घटसर्पाचे (डिप्थेरिया) प्रमाण जास्त आढळून आल्याने आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. ही लस प्रौढांना सरकारी रुग्णालयांत मोफत मिळणार आहे. या लसीमध्ये धनुर्वात लसीचे प्रमाण पूर्वीसारखेच जास्त असून, घटसर्पाचे प्रमाण कमी असणार आहे.राज्यातील सरकारी रुग्णालयात धनुर्वात प्रतिबंधक म्हणजेच ‘टीटी’ची लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. आतापर्यंत ही लस गर्भवतींसह १० ते १५ वर्षपर्यंतच्या लहान मुलांना नि:शुल्क दिली जात होती. नियमित लसीकरणात या लसीचा समावेश होता; मात्र धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प (डीपीटी) या तीन लसींसह हिपॅटायटिस बी आणि इन्फ्लूएंझा (हिप) अशा विविध प्रकारच्या लसीदेखील देण्यात येत होत्या. त्यासाठी केंद्र सरकारने ‘पेंटाव्हॅलेंट’ ही पाच लसींची संयुक्त लस एकत्रित करून देण्यास सुरुवात केली.त्यामुळे वारंवार सुई टोचण्यापासून लहान मुलांची सुटका झाली. दीड आणि पाच वर्षांच्या मुलांना ‘डीपीटी’ ही त्रिगुणी लस दिली जाते. त्यामुळे दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांच्या बालकांसह पाच वर्षाच्या मुलांना ‘डीपीटी’, तसेच बूस्टर लसीमधून घटसर्पाच्या लसीचा डोस मिळत होता; मात्र आता धनुर्वातासोबत घटसर्पाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात नुकतीच सुरू झाली आहे.
‘डब्ल्यूएचओ’ची सूचनाघटसर्पाची लस पाच वर्षापर्यंतच्या मुलांना सहज मिळते; मात्र ५ ते १० वर्षे आणि १० ते १५ वर्षांपर्यतच्या मुलांमध्ये घटसर्पाच्या आजाराचे प्रमाण आढळल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धनुर्वातासह (टीटी) आता घटसर्प (डिप्थेरिया) ही संयुक्त लस देण्याची सूचना केली. सध्या १० आणि १६ वर्षाच्या मुलांसह प्रौढांना ‘टीटी’ ऐवजी ‘टीडी’ ही लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीतून दोन्ही आजारांना प्रतिबंध होणार आहे.
राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांत ही लस देण्यात येत आहे. मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे घटसर्प लस संयुक्तपणे दिली जाणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक