अकोला : कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, जिनिंगमधील कापसात बोंडअळ्या आढळून आल्याने या अळीच्या नियंत्रणासाठी जिनिंगमध्ये कामगंध सापळे लावण्याचा निर्णय राज्य कापूस जिनिंग असोसिएशनने घेतला आहे.मागील वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. त्यामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले. यावर्षीदेखील जिनिंगमध्ये येणाऱ्या कापसामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत येत असल्याचे दिसून आले आहे. ही अळी कापसाच्या बोंडातील कापूस व बियाणे फस्त करीत असल्यामुळे कापसाची प्रत खराब होते. ही गुलाबी बोंडअळी कचºयामध्ये पाच ते सहा महिने राहण्याची क्षमता आहे. हीच अळी पुन्हा पुढच्या वर्षीच्या पिकावर हल्ला करते. म्हणूनच या अळीचे नियंत्रण आताच करण्यासाठीची पावले उचलण्यात येत आहेत.शेतातून आणलेल्या कापसात ही अळी जिनिंगमध्ये येत असून, तिला पोषक वातावरण मिळताच या अळीचे पतंग बाहेर येतात. यासाठी असोसिएशन व एका खासगी कंपनीने मिळून अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठीचा कार्यक्रम आखला आहे. या कंपनीचे प्रतिनिधी जेथे जिनिंग आहे, तेथे सापळे पोहोचविणार आहेत. एका जिनिंगला १५ ते २० कामगंध सापळे दिले जाणार आहेत. यासाठी या विषयातील माहिती असलेल्या कर्मचºयाची नियुक्ती करण्यात यावी, असे कापूस असोसिएशनने जिनिंग मालकांना आवाहन केले आहे.कामगंध सापळे लावून त्यामध्ये जमा झालेल्या किडींचा दर दोन-तीन दिवसांनी नायनाट करणे आवश्यक असून, वेळोवळी या सापळ्यातील ल्यूर बदलण्याची जबाबदारी जिनिंगने घ्यावी, असे पत्रही जिनिंग मालकांना देण्यात आले आहे.