अकोला : हरभर्याचे टरफल आता यंत्राद्वारे काढता येईल. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित केले आहे; परंतु या यंत्राची बाजारात येण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.विदर्भात रब्बी हंगामात हरभरा पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. पूर्वी त्याची पेरणी बैलजोडीने तिफन लावून केली जात असे. आता जवळपास सर्वच शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. हरभर्याची काढणी मात्र आजही हातानेच करावी लागते. हे पीक हार्वेस्टरने काढता यावे, याकरिता झाडाची लांबी वाढविण्याबाबत काही कृषी विद्यापीठांनी संशोधन हाती घेतले आहे. सोयाबीनच्या झाडाएवढी लांबी वाढल्यास पेरणी आणि काढणी सोपी होईल. त्यामुळे शेतकरीदेखील नवीन हरभरा बियाणाची प्रतीक्षा करीत आहेत.दरम्यान, रब्बी हंगामात बाजारात मोठय़ा प्रमाणात ओला हरभरा विक्रीस येतो. यात काबुलीसह गावरान हरभरा शेतकरी, व्यापारी आणणात. गावरान हरभरा खारवट, आंबट असल्याने झाडे धुवून विक्री करावी लागते. यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पर्याय शोधला असून, हरभर्याचे घाटे सोलणारे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राने हरभर्याचे टरफल काढणे सोपे झाल्याने शेतकरी, छोट्या भाजीपाला विक्रेत्यांना मोठय़ा प्रमाणात हिरवे दाणे विकता येतील. डॉ. पंदेकृविने यापूर्वी तुरीच्या हिरव्या शेंगा सोलणारे यंत्र विकसित केले आहे. त्याच यंत्राने वाटाण्याच्या शेंगेतून दाणेदेखील काढता येतात. हरभर्यासंदर्भात मागणी मोठी असल्याने कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी कापणीपश्चात तंत्रज्ञान विभागाने मागील एक वर्षापासून हरभरा टरफल काढणी यंत्र संशोधन हाती घेतले होते. संशोधनाचे काम पूर्ण झाले असून, राज्यस्तरीय संशोधन आढावा समितीसमोर या यंत्राचे सादरीकरण करावे लागणार आहे. या सभेत मान्यता मिळाल्यास हे यंत्र बाजारात आणले जाईल.
हरभ-याचे टरफल काढता येईल आता यंत्राने!
By admin | Published: March 02, 2016 2:37 AM