अकोला: महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंंत उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करावे लागतील. या दरम्यान २९ जानेवारी रोजी रविवार सुटीचा दिवस असला तरी ऑनलाइन नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवारांना पुरेसा अवधी देण्यासाठी २९ जानेवारी रोजी (रविवार)देखील उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. राज्यातील दहा महापालिकांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा प्रथमच चार उमेदवारांचा एक याप्रमाणे प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे प्रभागांच्या भौगोलिक क्षेत्रफळात व मतदारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. प्रत्येक मतदारांपर्यंंत पोहोचताना संभाव्य उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागेल. यात भरीसभर आता इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) सादर करावे लागतील. संगणकाद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता व उमेदवारांना अर्ज सादर करताना पुरेसा अवधी देण्याच्या उद्देशातून २९ जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी सुटीच्या दिवशीदेखील उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
आता रविवारी स्वीकारणार उमेदवारी अर्ज!
By admin | Published: January 26, 2017 10:07 AM