अकोला: पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत सोमवारी मनपा आवारात प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरातील साहित्य मनपा आवारात आणत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शहरातील पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल देण्यासाठी शून्य कंसल्टन्सीची तांत्रिक सल्लागारपदी नियुक्ती केली. एजन्सीने ५४ हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले. सन २०१६-१७ पासुन अद्यापही गरीब लाभाथ्र्यांना आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याचे पाहुन सोमवारी जुने शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील प्रहार संघटनेचे सेवक मनोज पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेत ''आता महापालीका हेच आमचे घरकुल’ असे अभिनव आंदोलन छेडले. यावेळी मनपा आवारात लाभाथ्र्यांनी त्यांच्या घरातील साहित्य आणून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये रोहित गावंडे, परेश धुमाले, सागर भाकरे, श्याम क्षिरसागर, सागर टेंबे, शुभमसिंग ठाकुर, संतोष हिरुळकर, शिवा शिंदे, स्वप्नील घड्याळजी, देवा महल्ले, कार्तिक दांडगे, बॉबी पळसपगार, कुणाल जाधव, सै. नुर, अभय डाहाळे, तुषार उज्जैनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.
पालकमंत्र्यांनी वेषांतर करून घेतला प्रशासनाचा कानोसा!
जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी दुपारी वेषांतर करून महापालिकेची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आयुक्त निमा अरोरा यांच्या दालणात जावून आयुक्तांच्या उपस्थितीबद्दल माहिती घेतली. यावेळी आयुक्त उपस्थित नसल्याची माहिती स्वीय सहायक जितेंद्र तिवारी यांनी पालकमंत्र्यांना दिली. नगररचना विभागाकडून कामे होत नसल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले असते तुमची तक्रार असेल तर उपायुक्त उपस्थित आहेत. त्यांच्याकडे करता येईल, असे आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितले असता पालकमंत्री मनपाच्या बाहेर निघाले.