अकोला : भारत सरकारच्या आयकर विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पॅनकार्ड (स्थायी लेखा संख्याकार्ड) मध्येही आता घोळ सुरू झाला आहे. अकोल्यातील पॅनकार्डधारक व्यक्ती अब्दुल रहेमान अब्दुल हक्क यांना नुकतेच पॅनकार्ड प्राप्त झाले आहे. त्यांच्या पॅनकार्डवर सौ. संगीता पंजाबराव गुल्हाने या महिलेचा फोटो आणि स्वाक्षरीही आहे. जर अब्दुल रहेमानचा फोटो त्यांच्या पॅनकार्डवर नाही, तर त्यांचा फोटो इतर कोणत्यातरी पॅनकार्डवर चुकीचा चिकटविला गेला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यंत जागरूकतेने पॅनकार्डची निर्मिती होते, हा समज आता पूर्णत: फोल ठरत आहे. संगीता गुल्हाने नामक महिलेला मिळालेल्या पॅनकार्डवर आता कोणती चूक झालेली आहे, हे त्या महिलेलाच ठाऊक. जर गुल्हाने यांच्या पॅनकार्डवर अब्दुल रहेमान यांचा फोटो असेल, तर दोन कार्ड चुकले. मात्र अब्दुल रहेमान यांचा फोटो जर आणखी इतर कोणत्या पॅनकार्डवर गेला असेल, तर अकोल्यातील अनेक पॅनकार्ड चुकलेत, एवढे मात्र निश्चित. चुकलेल्या पॅनकार्डधारकांची आता स्थायी लेखा संख्याकार्डच्या यंत्रणेतून कशी सुटका होते. त्यांना काय दाखले द्यावे लागतील, हे आयकर विभागालाच ठाऊक.