अकोला : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, आता महानगरातून ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यंत्रणा सतर्क करण्याची तयारी सुरू झाली असून, तशा सूचना प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणेला मिळाल्याची माहिती आहे.राज्यभरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर शहरात उपचार होत असल्याने रुग्णालयांवर ताण वाढला आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच कायम राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील यंत्रणा सतर्क करण्याचे निर्देश राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एका पत्राद्वारे आरोग्य यंत्रणेला दिल्याची माहिती आहे. त्यानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गावनिहाय कोरोनाबाधित रुग्णांची माहिती संकलित करणे, बाह्य रुग्ण तपासणीसह इतर पीएचसी स्तरावरच क्वारंटीन कक्षाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामधील पायाभूत सुविधा वाढविण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकांमधील समन्वय आणि त्यांची जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आशा आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याबाबतही आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.अतिजोखमीच्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षणकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिजोखमीच्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करण्याबाबत सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. त्यनुसार, पुढील आजारांच्या रुग्णांवर विशेष लक्ष असणार आहे.
- असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी)
- नियमित डायलिसिसवर असणारे रुग्ण
- श्वसनसंस्थेचे जुनाट आजार, कर्करोग, आत्यंतिक स्थुलत्व असणारे तसेच अतिजोखमीचे आजारी व्यक्ती
- क्षयरोगी तसेच एचआयव्ही बाधित व्यक्ती
- ६० वर्षांवरील आणि अतिजोखमीचे आजारी व्यक्ती
- कामासाठी जिल्ह्यात स्थलांतरित झालेले समूह
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागात विशेष तयारीला प्राधान्य दिले जात आहे. अतिजोखमीच्या व्यक्तीकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाणार असून, ग्रामीण भागातच उपचार आणि क्वारंटीनची व्यवस्था करण्यावर भर असणार आहे.- डॉ. सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला