फहीम देशमुखशेगाव (जि. बुलडाणा), दि. ५ : जिल्हा परिषदांच्या शाळांमधे विविध बदल घडवित असतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या शासन आदेशान्वये आता शाळांना रँकिंग दिले जाणार आहे. रंगांद्वारे शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार व रँक दिली जाणार आहे.शाळा स्वच्छ, समृद्ध व आरोग्यदायी असेल तरच ज्ञानाची आदान-प्रदान प्रक्रिया प्रभावी आणि परिणामकारक होत असते. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरापयर्ंत तीन समित्या असणार आहेत. तालुकास्तरावरील समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी व अन्य सदस्य, जिल्हास्तरावरील समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सदस्य, तर राज्यस्तर समितीमध्ये प्रधान सचिव व अन्य सदस्य असणार आहेत. या समित्यांतर्फे शाळांचे परीक्षण व गुणांकन होणार असून, त्याद्वारे त्यांचे रँकिंग होणार आहे.पुरस्कारासाठी पाच क्षेत्रे व ३९ घटक निश्चित केले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे पाण्याची उपलब्धता २२ गुण, शौचालयाची व्यवस्था २८ गुण, हात धुण्याची व्यवस्था २0 गुण, देखभाल व्यवस्था १५ गुण, वर्तवणूक बदल व क्षमता विकास १५ गुण याप्रमाणे गुणांकन होणार आहे.या गुणांकनाच्या आधारावर ९0 ते १00 गुण प्राप्त हिरवा रंग, ७५ ते ८९ गुण प्राप्त निळा रंग, ५१ ते ७४ गुण पिवळा रंग, ३५ ते ५0 गुण नारंगी रंग व ३५ पेक्षा कमी गुण लाल रंग, असे रँकिंग होणार आहे. स्पर्धा प्रामुख्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर होणार असून, ज्यांचा प्राप्त रेटिंग किमान पिवळा असेल, अशा शाळा यात सहभागी होतील. ग्रामीण विभागात तीन प्राथमिक व तीन माध्यमिक शाळा, तसेच प्रत्येक क्षेत्रातील हिरवा रँकिंग शाळा अशा ३0 शाळा पुरस्कारासाठी पात्र असतील. शहरी विभागात एक प्राथमिक व एक माध्यमिक शाळा, तसेच प्रत्येक उपक्षेत्रातील हिरवा स्टार प्राप्त एक प्राथमिक व एक माध्यमिक अशा १0 शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरतील. जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळा ज्यांचा किमान प्राप्त रेटिंग हा निळा स्टार असेल. या स्तरावरील स्पर्धेकरिता पात्र असतील. एकूण २0 प्राथमिक, त्यामध्ये १५ ग्रामीण व ५ शहरी शाळा असतील. २0 माध्यमिक त्यामध्ये १५ ग्रामीण व ५ शहरी शाळांचा समावेश असेल. एकूणच काय तर या स्पर्धेमुळे शाळांचे बाह्यांग आणि अंतरंग बदलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे आकर्षण वाढेल.
आता शाळांचा लूकही बदलणार!
By admin | Published: August 06, 2016 1:49 AM