अकोला :प्रीमियम हमसफर रेल्वेगाड्यांमध्ये आतापर्यंत केवळ थर्ड एसी कोच लावले जात असत; मात्र या रेल्वेत पाहिजे त्या तुलनेत आरक्षण होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने आता हमसफर रेल्वेतही स्लीपर सेवा सुरू करण्याचा अभिनव आणि प्रवाशांना सुखकर असा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस आरक्षणाची घसरणारी संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने हमसफर रेल्वेत आता स्लीपर कोचची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच या रेल्वेतील प्रवास खर्चही मध्यमवर्गीयांच्या आटोक्यात राहणार असल्याची चिन्हे आहेत. ही घोषणा भुसावळ रेल्वे मंडळाने केली आहे.अकोल्याहून धावणाऱ्या प्रीमियम हमसफर गाड्यांमध्ये अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेस आणि नांदेड जम्मूतवी एक्स्प्रेसचा समावेश आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये आता यापुढे स्लीपर कोच लावल्या जाणार असल्याची सुखद माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोबतच या रेल्वेगाड्यांतील आरक्षण करणाºया प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी भाड्याच्या दरातही काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. या सेवेची सुरुवात प्रीमियम हमसफर रेल्वेपासून होत आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये गत काही दिवसांपासून आरक्षण करणाºयांची संख्या रोडावली होती. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही सेवा या रेल्वेगाड्यांमध्ये सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनाने फेलक्सी प्रवास खर्च कमी करीत भाड्यातदेखील डिस्काउंट दिले आहे.तत्काळ तिकीट सेवादेखील आटोक्यातसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हमसफर रेल्वेगाडीत तत्काळ तिकीट सेवा अत्यंत महागडी असायची. मूळ तिकिटाच्या दीडपट दर आधी लागायचे. त्यातही रेल्वे प्रशासनाने सवलत दिली आहे. त्यामुळे हमसफर रेल्वेगाडीत आता तत्काळ सेवा मिळविणेदेखील सर्वसामान्य व्यक्तींच्या आटोक्यात आले आहे. यासोबतच काही निवडक रेल्वेंमध्ये २५ टक्क्यांपर्यत भाड्यात सवलत दिली जात आहे. सवलत जाहीर झालेल्या रेल्वेगाड्यांमध्ये शताब्दी, गतिमान, तेजस, डबल डेकर आणि इंटरसिटी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वे मालगाड्यांच्या भाड्यातही १५ ते २० टक्के सूट देण्यात आली आहे.