अकोला: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इंदिरा आवास योजनेच्या घरकुल लाभार्थींना अनुदानाचे वाटप आता पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम (पीएफएमएस) प्रणालीद्वारे केले जाईल. २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून ही प्रणाली लागू करून थेट लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दारिद्रय़रेषेखालील पात्र लाभार्थींना रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधून देण्याची शासनाची योजना आहे. घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकामाच्या टप्प्यानुसार संबंधित लाभार्थींंना वेळोवेळी धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते; परंतु अनेकदा धनादेशाची रक्कम लाभार्थींकडून इतर कामांसाठी खर्ची होत असल्याने घरकुलांचे निर्माण पूर्ण होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यामुळे लाभार्थींंना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागते. शिवाय घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थींंना धनादेशासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या तक्रारींची मोठी संख्या आहे. या सर्व बाबी ध्यानात घेता, इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थींंना प्राप्त अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वळती करण्यासाठी पीएफएमएस प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनाने १७ जुलै रोजी निर्णय घेत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सूचना जारी केल्या आहेत.
घरकुलचे अनुदान वाटप आता ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे
By admin | Published: July 22, 2015 10:48 PM