या भूमापनामागे गावठाणांच्या सीमा निश्चित करणे, मिळकती व रस्त्यांचे सीमांकन करणे, चुन्याच्या साहाय्याने मिळकतीची हद्द निश्चित करणे, गावठाणांचे ड्रोन छायाचित्र काढणे, सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून जीपीएस निर्देशांक वापरून प्रतिमा लिखित करणे, प्रतिमांची जोडणी करणे, डिजिटल नकाशा काढणे, इटीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे आदी कामे होणार आहेत. ड्रोन मोजणीचे ग्रामस्थांना होणारे फायदे
प्रत्येक धारकाचे जागेचा/ मिळकतीचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होईल. प्रत्येक धारकाला आपल्या मिळकतीचा मालकी हक्क संबंध मिळकत पत्रिका व सनद मिळेल. गावठाणातील जागेची मिळकत पत्रिकेस शेतीचे सातबाराप्रमाणेच धारकाचे मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता राहील. मिळकत पत्रिकेच्या आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते. तारण करता येईल. जमीनदार म्हणून राहता येईल. असे विविध लाभ घेता येतील. गावठाणातील जमीनविषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात येतील. गावठाण भूमापन व नकाशे अभिलेखांचा उपयोग होईल. मिळकतीसंबंधी बाजारपेठेमध्ये तरलता येईल व ग्रामस्थांची आर्थिक पत उंचावणार आहे.