अकोला: जगाला प्रेम व शांततेचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूंचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण शनिवार, २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. ख्रिस्ती धर्मीयांच्या या सणानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, बाजारपेठाही सजल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून सण साजरा करण्यात येणार आहे.
नाताळ अवघ्या पाच दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घरांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील सर्व चर्चेसना आणि घरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील गांधी रोड व इतर बाजारपेठांमध्ये लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉज टोपी, कपडे, चॉकलेटस, केकस, कॅडबरी, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी मेणबत्या आणि डिझायनर जिंगल बेल्स दाखल झाल्या असून, त्यांच्या खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची झुंबड उडाली असल्याचे दिसून येते. यादिवशी केकही कापले जात असल्याने बेकरीमध्ये विविध फ्लेवरमधील व विविध आकारातील साधे केक, पेस्ट्री केक सजविले जात आहेत.
ख्रिश्चन कॉलनी उजळली
नाताळानिमित्त १६० वर्षांचा इतिहास असलेली ख्रिश्चन कॉलनी आकाशदिवे, कंदील, रंगबिरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी करण्यात आली.
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे ३० चर्चेसमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.