मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी १.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. काही अटींच्या अधीन राहून शहरवासियांना आता प्रती १०० रुपये याप्रमाणे वार्षिक १२०० रुपये द्यावे लागणार आहेत.
शहरातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दुर करण्यासाठी १२ फेब्रुवारीच्या पत्रानुसार काटेपुर्णा ते कुरळा पाइपलाइनसाठी १ कोटी ३४ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता मालेगावची पाण्याची समस्या मिटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मालेगाव शहराच्या आजुबाजुला कोल्ही, केळी, कुरळा आणि काटेपूर्णा हे प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पात फार प्रमाणात पाणी असते. मात्र उन्हाळ्यात यापैकी केवळ काटेपूर्णा प्रकल्पात पाणी असते आणि तेथील पाणी सुद्धा आरक्षित केले आहे. मात्र प्रशासकीय मान्यतेअभावी तेथील पाणी मालेगावला आणणे अशक्य होते. प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी नगर पंचायतने जिल्हास्तर ते मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर आता मान्यता मिळालेली आहे. या आकस्मिक योजनेंतर्गत काटेपूर्णा प्रकल्पापासून ते कुरळा धरणापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्यात येणार आहे. ही योजना १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासाठी १ एप्रिलपासून मालेगावकरांना पाणीपट्टी कर वाढवून भरावा लागणार आहे. कर वाढविला तरच या योजनेअंतर्गत मालेगावकरांना पाणी मिळणार आहे तसेच पाच टक्के लोकवर्गणी अंतर्गत किमान साडेसहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. हेसुद्धा मालेगावकरांच्या करामधूनच भरण्यात येणार आहे. दरम्यान, कर वाढणार असल्याने मालेगावकरांना आता ३६० रुपयांऐवजी वर्षाकाठी १२०० रुपये भरावे लागणार आहेत.