मदत संतोष येलकर
अकोला: माहिती अधिकारात दाखल होणारे अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या कार्यवाहीसाठी अमरावती विभागातील जनमाहिती अधिकाऱ्यांसाठी आता ‘वेब अप्लिकेशन’ कार्यान्वित करण्याचा उपक्रम राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठामार्फत येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे माहिती अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्यांकडे दाखल होणारे अर्ज तातडीने निकाली काढण्यास मदत होणार आहे.
माहिती अधिकारात विविध विभागांच्या कार्यालयांमधील जनमाहिती अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकरणांत माहितीसाठी अर्ज दाखल करण्यात येतात. परंतु माहिती अधिकारात दाखल अर्ज निकाली काढण्यासाठी विलंब होतो. तसेच माहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढताना चुका होतात. त्यानुषंगाने माहिती अधिकारात दाखल अर्ज ३० दिवसाच्या कालावधीत निकाली काढण्यात यावा आणि त्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्यांकडून चुका होऊ नये, यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने जनमाहिती अधिकाऱ्यांसाठी ‘वेब अप्लिकेशन’ तयार केले असून, याच्या आधारे जनमाहिती अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकारातील अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया येत्या आठवडाभरात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्यांना मदत होणार आहे.
५० हजार जनमाहिती
अधिकाऱ्यांना होणार मदत!
राज्य माहिती आयुक्त अमरावती खंडपीठाने तयार कलेल्या ‘वेब अप्लिकेशन’व्दारे माहिती अधिकारातील अर्ज निकाली काढण्याच्या कार्यवाहीत माहिती अधिकारातील अर्ज ३० दिवसात आणि अचूक पध्दतीने निकाली काढण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात विविध कार्यालयांच्या ५० हजार जनमाहिती अधिकाऱ्यांना मदत होणार आहे.
माहिती अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्यांकडे दाखल होणारे अर्ज विहित वेळेत निकाली काढणे आणि त्यामध्ये चूक होऊ नये, यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने ‘वेब अप्लिकेशन’ विकसित केले आहे. येत्या आठवडाभरात अमरावती विभागात ५० हजार जनमाहिती अधिकाऱ्यांकडून हे सुरु करण्यात येणार आहे.
संभाजी सरकुडे
राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ