लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एनआरसी कायद्याला मुस्लीम समाजाचा मोठा विरोध सुरू आहे. त्यामुळे हा कायद्या मुस्लीमविरोधी आहे, असा देखावा निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अॅड.आंबेडकर यांनी शुक्रवारी कुटासा, सावरा, मुंडगाव, हिवरखेड, आडसुळ फाटा, निंबा फाटा, पारस, सस्ती आदी ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले. ते म्हणाले की, देशातील सत्ताधारी सध्या मनमानी पद्धतीने कायदे तयार करत आहेत. लोकांचा विरोध ते बेदखल करत आहेत. या सत्ताधाऱ्यांना चाप बसायलाच हवा. देशाच्या तिजोरीत देश चालविण्यासाठी आवश्यक असलेला पैसासुद्धा नाही.त्यामुळे ते विविध फंडे वापरत असून, सर्वसामान्यांना वेठीस धरून सर्व विकायला काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर ताशेरे ओढले. शासन केवळ पर्यावरण बिघडल्याचे सांगते; परंतु त्यावरील उपाययोजना करीत नाही. अकोला जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगेत मी शासनाला बी पेरणीची परवानगी मागितली; पण दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करणारी एकमेव जि. प. ही अकोला आहे. त्यामुळे विकासाचे नियोजन करायचे असेल तर सरकारने जि. प. ला विकास निधी थेट द्यावा म्हणजे विविध योजना प्रभावीपणे राबविता येतील, असे ते म्हणाले.