- प्रवीण खेतेअकोला : कुपोषण मुक्तीसाठी राज्यभरात पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) कार्यरत आहे. या ठिकाणी कुपोषित बालकांना किमान १४ दिवसांसाठी निगराणीत ठेवले जाते; मात्र मजुरी बुडणार म्हणून अनेक पालक बालकांना ‘एनआरसी’मध्ये दाखल करीत नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेता एनआरसीमध्येच शंभर रुपये रोज बुडीत मजुरी दिली जाणार आहे.जिल्हा स्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र आहे; मात्र रोजगार बुडवून येथे मुलांना ठेवणे ग्रामीण भागातील पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे पालकही या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करतात. परिणामी, कुपोषणाचा लढा तोकडाच ठरत आहे. आवश्यक पोषण आहार देऊन या बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी त्यांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले जाते. या कालावधीत माताही त्या ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे; मात्र तसे होत नाही. अशा परिस्थितीत कुपोषण मुक्तीची ही मोहीम फत्ते करण्यासाठी शासनातर्फे कुपोषित बालकांच्या मातांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. बुडीत मजुरीमुळे मातांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना एनआरसी केंद्रातच रोखीने १०० रुपयांची बुडीत मजुरी दिली जाणार आहे. आतापर्यंत ही बुडीत मजुरी थेट मातांच्या खात्यात जमा करण्यात येत होती; मात्र अनेकांच्या खात्यात बुडीत मजुरी जमा होत नसल्याच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे यापुढे मातांना ही बुडीत मजुरी थेट रोखीने दिली जाणार आहे.हे आहेत ‘एनआरसी’चे फायदेबालकांचे वजन वाढण्यासाठी योग्य पोषण आहारशारीरिक विकासासोबत बौद्धिक विकासमातांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण‘एनआरसी’मध्ये कुपोषित बालकांसोबतच मातांनाही पौष्टिक आहार दिल्या जातो. हा आहार बालकांना नियमित घरीदेखील मिळावा, यानुषंगाने आहार तज्ज्ञांकडून मातांना विविध पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण दिल्या जात आहे.मजुरी बुडते म्हणून अनेक पालक आपल्या कुपोषित बालकांना ‘एनआरसी’मध्ये आणत नाहीत. ही बाब लक्षात घेता मातांना प्रोत्साहन देऊन त्यांना बुडीत मजुरी आता रोखीने देण्यात येणार आहे. याशिवाय, मातांना पौष्टिक पाककृतींचेही प्रशिक्षण दिले जात आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.