लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र शासनाने नागरिक त्व दुरुस्ती कायदा (सीएए) तसेच भारतातील अवैध रहिवाशांना ओळखून त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी लागू केलेल्या ‘एनआरसी’ कायद्याच्या विरोधात रविवारी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले. स्थानिक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित जनसभेमध्ये जमलेल्या मुस्लीम बांधवांनी ‘एनआरसी’ कायद्यासाठी कागदपत्रे सादर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. या विशालकाय जनसभेचे ‘तहफ्फुजे कानून-ए-शरियत कमिटी’च्यावतीने आयोजन करण्यात आले होते.केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘सीएए आणि एनआरसी’ कायद्याच्या विरोधात रविवारी मुस्लीम बांधवांनी रोष व्यक्त केला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध वाहनांद्वारे आलेल्या मुस्लीम बांधवांना ‘तहफ्फुजे कानून-ए-शरियत कमिटी’च्यावतीने आयोजित जनसभेत मार्गदर्शन करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मौलाना अब्दुल रशिद कारंजी-रिजवी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या दोन्ही कायद्यांमुळे देशभरातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी केला.याप्रसंगी मौलाना सैयद जहीरुल इसलाम ऊर्फ जकीमियां नक्शबंदी, मौलाना सफदर कासमी, मौलाना अब्दुल जब्बार मजाहरी, मौलाना गुलाम मुस्तफा, कारी मकसूद अहमद, मुफ्ती गुफरान गाजी, मौलाना तुफैल नदवी, मुफ्ती मोहम्मद हुफैज, मौलाना अब्दुल वाहिद, सैयद शाहनवाज जुल्फुकारी यांच्यासह भन्ते अश्वजित थेरो, वजीर खान, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रदीप चोरे व फादर मार्क्स ए. खांडेकर उपस्थित होते.‘हम’मुळे देश तयार झालाय!‘हम’ या शब्दातील ‘ह’ म्हणजे हिंदू आणि ‘म’ म्हणजे मुसलमान, यांनी मिळून देश तयार झाला आहे. हा देश कोणत्या एका जाती-समूहाचा कदापि नव्हता आणि राहणार नाही. केंद्र शासनाच्या हिटलरशाहीमुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या देशाला अनावश्यक कायद्यांची गरज नसून, गरिबी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मौलाना सैयद जहीरुल इसलाम ऊर्फ जकीमियां नक्शबंदी यांनी सांगितले. या देशाचे मूळ निवासी असलेल्या मुस्लिमांना देश प्रेम सांगण्याची गरज नाही. आम्ही देशाप्रती बांधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौका-चौकांत व्हॉलेंटियर्स‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधात रविवारी अकोला क्रिकेट क्लब येथे जनसभा घेण्यात आली. हजारो मुस्लिमांनी येथे उपस्थिती दर्शविली. यावेळी कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी चौका-चौकांत व्हॉलेंटियर्सनी धुरा सांभाळली. वाहनधारकांना पर्यायी रस्त्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जनसभेत सहभागी लोकांना शांती आणि शिस्त पाळण्याचे आवाहन व्हॉलेंटियर्स यांनी केले.
सत्ता आज आहे उद्या नाही, याचे भान ठेवा!या देशात मुस्लीम आणि हिंदू समाजाने शांततेने राहावे, या उद्देशातून भारताची फाळणी झाली होती. विद्यमान कें द्र सरकार देशातील वातावरण गढूळ करीत आहे. आजपर्यंतही सर्वसामान्यांच्या खात्यात १५ लाख जमा झालेच नाही. नागरिकांचे लक्ष भरकटण्यासाठी केंद्र सरकार खेळी खेळत आहे. सत्ता आज आहे, उद्या नाही, याचे भान मोदी-शाह यांनी ठेवण्याची गरज असल्याचा सूचक इशारा मौलाना अब्दुल जब्बार मजाहरी यांनी यावेळी दिला.
ग्रामीण भागातील लोकांचाही सहभागनिषेध मोर्चात शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाज सहभागी झाला होता. यामध्ये वयोवृद्धांसह चिमुकल्यांचाही सहभाग होता.