लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९८ हजारांहून अधिक प्रमाणात घटली आहे. गतवर्षी २ लाख ९६ हजार १२५ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते, तर यंदा केवळ १ लाख ९८ हजार १२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता आले नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अमलबजावणीचे निर्देश २९ जून रोजी शासनाने दिले होते. विलंबाने निर्णय झाल्याने योजना राबविण्याबाबत योग्यरित्या नियोजन करता आले नाही. त्यात पुरेशी प्रचार, प्रसिद्धी होऊ शकली नाही. शिवाय काही बँकांकडून पीक विमा हफ्ता भरून घेण्यास दिलेला नकार, महाभूलेख पोर्टलवर सातबारात तांत्रिक दोष, तसेच नेट कनेक्टिव्हीटचा खोटा आदि कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज भरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे शेतकºयांचा पीक विमा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र ारात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मूभाही दिली. तथापि, उपरोक्त अडचणींमुळे जिल्ह्यातील केवळ १ लाख ९८ हजार १२२ शेतकºयांना पीक विमा योजनेत सहभागी होता आले. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १४ हजार ५८९ आहे, तर १ लाख ८३ हजार ५३३ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार १२६ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ८६ हजार ४९८, तर २ लाख ९ हजार ६२७ बिगर कर्जदार शेतकरी होते. पीक विमा योजनेत कर्जदार शेतकरी संख्येत मोठी घट जिल्ह्यात गतवर्षी ८६ हजार ४९८ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता, तर यंदा केवळ १४ हजार ५८९ शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकले. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हफ्ता भरून घेण्यास विविध बँकांनी केलेली टाळाटाळ, हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे जिल्ह्यातील स्थितीवरून स्पष्ट होत आहे.
पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ९८ हजारांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 4:37 PM