आरटीपीसीआरच्या एक लाखांवर चाचण्या पूर्ण
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल लॅब सुरू होऊन वर्ष होत आहे. या कालावधीत लॅबमध्ये कोविडच्या जवळपास दीड लाख चाचण्या केल्या आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. शनिवारी प्राप्त अहवालानुसार, व्हीआरडीएल लॅबमध्ये आतापर्यंत जवळपास एक लाखापेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूचा धोका वाढला आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे तापीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, काही रुग्णांमध्ये डेंग्यू सदृश्य तापीचे लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असून, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
ऑनलाइन खरेदीला पसंती
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठाही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा ऑनलाइन खरेदीकडे वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
अकोल्यात उन्हाचा पारा वाढला
अकोला : मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे कधी गर्मी, तर कधी थंडीचा जोर वाढल्याचे दिसून आले, मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याचे दिसून आले. शनिवारी जिल्ह्यात ३८.१ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. ही उन्हाळ्याची सुरुवात असली, तरी आगामी काळात अकोलेकरांना आणखी उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.
अंडरपासच्या कामाला वेग
अकोला : गांधी रोड ते जनता भाजी बाजार यादरम्यान अंडरपास रस्त्याची निर्मिती केली जात आहे. लॉकडाऊनदरम्यान अंडरपास निर्मितीचे काम रखडले होते. मात्र गत काही दिवसांपासून या कामाला गती मिळाली आहे. दोन्ही बाजूंनी जलद गतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पेट्रोलचा भडका, अकोलेकरांची सायकलला पसंती
अकोला : राज्यात पेट्रोल दरवाढीमुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे बहुतांश अकाेलेकरांकडून सायकलींना पसंती दर्शविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक जण महत्त्वाच्या कामांसाठीच दुचाकीचा वापर करीत आहेत. बाजारात जाण्यासाठी बहुतांश लोक दुचाकीऐवजी सायकल नेताना दिसून येत आहे.
अकोलेकरांना सुपर स्पेशालिटीची प्रतीक्षा
अकोला : अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारत तयार झाली असून, पहिल्या टप्प्यातील पदांनाही मंजुरी मिळाली आहे. मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरू झाली नाही. त्यामुळे रुग्णालय सुरू होण्याची अकोलेकरांची प्रतीक्षा कायम आहे.