अकोला: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्यावाढीचा दर कमी होत आहे; मात्र दुसरीकडे बाजारपेठेत होणारी गर्दी अन् नागरिकांची बेफिकीरी धोकादायक ठरू शकते. येत्या काळात जिल्ह्यात सण, उत्सवाचा काळ आहे. अशा परिस्थितीत ही बेफिकीरी पुन्हा रुग्णसंख्यावाढीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अकोलेकरांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. जून, जुलै आणि सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग लक्षणीय कमी झाला. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला; मात्र धोका अजूनही टळलेला नसल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. असे असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बेफिकीरी होताना दिसून येत आहे. अनेकांकडून मास्कचा वापर टाळण्यात येत आहे. तर बहुतांश लोक अजूनही स्वच्छ हात न धुता उघड्यावरील खाद्य पदार्थांचे सेवन करताना दिसून येत आहेत. शिवाय, आगामी काळात नवदुर्गा उत्सव, दसरा अन् दिवाळी हे मोठे सण, उत्सव असल्याने बाजारपेठेत गर्दी उसळणार आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी न घेतल्यास कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वातावरण बदलाचाही फटका
गत काही दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. त्याचा आरोग्यावरही परिणाम होत असून, अनेकांना सर्दी, खाेकला अन् व्हायरल फिवरच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोना रुग्णसंख्यावाढीस पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्वत:ला जपण्यासाठी हे करा!
- गर्दीच्या ठिकाणी जाताना टाळा
- मास्कचा नियमित वापर करा
- वारंवार स्वच्छ हात धुवा
- फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा
- लक्षणं आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.