आरटीओच्या डोळ्यात धूळफेक, शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला
अकोला : शहरातील विजय ट्रान्सपोर्ट संचालकाच्या मालकीच्या असलेल्या दोन ट्रकचा एकच क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर तिसऱ्या ट्रकचा क्रमांक हा संशयास्पद आहे. या ट्रकवरील सर्व नंबर प्लेट मिटविल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून विजय ट्रान्सपोर्टच्या संचालकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी आरटीओच्या डोळ्यात धूळफेक करीत तब्बल तीन ट्रकचा महसूल बुडविल्याची माहिती आहे.
विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल असिफ अब्दुल कदर यांची स्थानिक गुन्हे शाखेकडून गत काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. त्यांच्या मालकीचे तीन ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता यामधील दोन ट्रकचा क्रमांक एमएच ३० बिडी १६९३ हा एकच असल्याचे उघडकीस आले आहे, तर तिसऱ्या ट्रकचा क्रमांक मिटविण्यात आला आहे. त्यामुळे एका क्रमांकावरून तीन ट्रकमधून मालाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून ट्रक ताब्यात घेऊन संचालकांची चौकशी करण्यात येत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनाही याची माहिती देण्यात आली असून, ट्रकचा चेसिस क्रमांक, वाहतूक परवाना व इतर सर्व तांत्रिक मुद्द्यांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीनंतर यामधील ट्रक जप्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आरटीओची डोळेझाक; लाखोंचा महसूल बुडाला
विजय ट्रान्सपोर्टच्या मालकीच्या तीन ट्रकचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये दोन ट्रकवर एकच क्रमांक असल्याचे दिसून येत आहे, तर तिसर्या ट्रकवरील सर्व क्रमांक खोडण्यात आले आहेत. तसेच बाकीच्या नंबर प्लेट काढण्यात आल्या आहेत. यावरून केवळ एकाच वाहन क्रमांकावर तीन ट्रकमधून मालाची वाहतूक केल्याची माहिती आहे. मात्र, याचे काहीही सोयरसुतक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या डोळेझाकपणामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे.
जीवनावश्यक वस्तू नव्हत्याच
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने विजय ट्रान्सपोर्टचे तीन ट्रक ताब्यात घेतले. या तीनही ट्रकचे क्रमांक तसेच त्यामध्ये असलेल्या मालाची तपासणी केली असता यामधील दोन ट्रक रिकामे असल्याचे समोर आले. मात्र, ट्रान्सपोर्टच्या संचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी यामध्ये जीवनाश्यक वस्तू असल्याची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली. पोलिसांनी तपासणी केली असता दोन्ही ट्रक खाली असल्याचे उघडकीस आले आहे. याचे व्हिडिओ ही व्हायरल झाले आहेत.
ट्रान्सपोर्ट संचालकांनी केली पोलिसांची तक्रार
विजय ट्रान्सपोर्ट संचालकांनी पोलीस हप्ता मागत असल्याची तक्रार केली. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्टचे संचालक आता तक्रारी करत असल्याची माहिती दिली. कारण तिन्ही ट्रक जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामधून वाचण्यासाठी विजय ट्रान्सपोर्टचे संचालक पोलिसांच्या खोट्या तक्रारी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ट्रान्सपोर्ट संचालकांची अशी आहे तक्रार
विजय ट्रान्सपोर्ट संचालकांच्या तक्रारीनुसार राज्याच्या गृहमंत्र्यांना दहा लाख रुपये द्यावे लागतात. त्यासाठी हप्ता देण्यात यावा, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची तक्रार ट्रान्सपोर्ट संचालकांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधानांसह १३ जणांकडे केली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात येत असून, त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेत तब्बल आठ तास डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हप्ता दिला नाही तर व्यवसाय करू देणार नाही, अशा धमक्या पोलीस देत असल्याचे ट्रान्सपोर्ट संचालकांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.