अकोला : कोरोना संसर्गाची लाट ओसरल्याने रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असून, सैल झालेले निर्बंध व रक्षाबंधन सणाच्या पृष्ठभूमीवर प्रवासी संख्या वाढली असून, आगामी काही दिवसांसाठी आरक्षण फुल्ल झाले आहे. मुंबई, पुणे महानगरांकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये शयनयान व वातानुकुलित श्रेणीच्या तिकिटांसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही हीच स्थिती असल्याने कन्फर्म तिकीट मिळण्यास विलंब होत आहे.
अनलॉक प्रक्रियेअंतर्गत निर्बंध सैल झाल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत आहेत. अशातच सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी पाहावयास मिळत आहे. सध्या केवळ विशेष रेल्वे धावत असल्याने आरक्षित तिकिटांवरूनच प्रवास करणे बंधनकारक आहे. मुंबई ते कोलकाता या मार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या स्थानकावरून दररोज तब्बल ११२ एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू आहे. यापैकी बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्या
०२१०५ मुंबई - गोंदिया
०२११ मुंबई - अमरावती
०१०३९ कोल्हापूर - गोंदिया
०२८०९ मुंबई - हावडा
०२१६९ मुंबई - नागपूर
०२२८० हावडा - पुणे
०२८३३ अहमदाबाद - हावडा
या गाड्यांमध्ये वेटिंग
विदर्भ एक्स्प्रेस : स्लिपर ५६ वेटिंग, एसी १९ वेटिंग
सेवाग्राम एक्स्प्रेस : स्लिपर २४ वेटिंग, एसी ४ वेटिंग
गीतांजली एक्स्प्रेस : स्लिपर ३३ वेटिंग, एसी १४ वेटिंग
आझाद हिंद एक्स्प्रेस : स्लिपर ७२ वेटिंग, एसी ३२ वेटिंग
महाराष्ट्र एक्स्प्रेस : स्लिपर ६७ वेटिंग, एसी ८ वेटिंग
प्रवासी संख्या दुपटीने वाढली
कोरोनाची लाट ओसरण्यापूर्वी अकोला स्थानकावरून दररोज १००० ते १५०० प्रवासी प्रवास करत होते. आता निर्बंध सैल झाल्यानंतर प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. गत काही दिवसांपासून जवळपास ३ हजारावर प्रवाशांची स्थानकावर ये-जा होत आहे. कोरोनाची लाट ओसरणे व सणासुदीचे दिवस प्रारंभ होण्याचा हा परिणाम असल्याचे सुत्रांनी सांगितले.