नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठी, सेमी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण व्हावे आणि त्यांना इंग्रजी भाषा बोलता, लिहिता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून स्पोकन इंग्लिश योजना राबविली जात आहे. गतवर्षी स्पोकन इंग्लिशचा उपक्रम ४३८ शाळांमध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी मात्र स्पोकन इंग्लिशसाठी ई-लर्निंग वापर करण्यासोबतच तासिका घेणार्या शाळांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ८१ शाळांमध्येच ई-लर्निंगचा वापर करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इयत्ता नववी, दहावीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलता, लिहिता यावी, यासाठी शिक्षण विभागाने काही वर्षांपासून ई-लर्निंग राबविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिश (ई-लर्निंग)चा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी जिल्हय़ातील ४३८ शाळांमध्ये ई-लर्निंगचा उपक्रम राबविण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. तसेच या शाळांना तसे उद्दिष्ट देण्यात आले होते. गतवर्षी स्पोकन इंग्लिश शिकविण्यासाठी ८९ शाळांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष तासिकांचे आयोजन केले होते; परंतु यंदा त्यातही घट होऊन ७५ शाळांमध्येच इंग्लिश स्पोनकच्या तासिका राबविण्यात येत असल्याची माहिती आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांंना इंग्रजी भाषा आत्मसात करावी, त्यांना भाषा शिकताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या दृष्टिकोनातून ब्रिटिश कौन्सिलमार्फत इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षित शिक्षकांमार्फत शाळांमध्ये स्पोकन इंग्लिशचे धडे दिले जातात. जिल्हय़ामध्ये सद्यस्थितीत ब्रिटिश कौन्सिलमार्फत प्रशिक्षित करण्यात आलेले ११ तज्ज्ञ शिक्षक आहेत. गतवर्षी २५५ शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांनी ई-लर्निंगचा वापर करून स्पोकन इंग्लिश विषयावर मार्गदर्शन केले. यंदासुद्धा नववी व दहावीतील विद्यार्थ्यांंना इंग्रजी विषयाचे धडे देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत; परंतु काही शाळा वगळता, जिल्हय़ातील इतर शाळा इंग्लिश स्पोकन योजना राबविण्याबाबत शिक्षण विभागाला सहकार्य करीत नसल्यामुळे संख्या घटत आहे. शासनाचा शिक्षण विभाग शाळांमधील विद्यार्थ्यांंच्या गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे. यादृष्टीने प्रयत्न करीत असताना शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र शिक्षण विभागाच्या अहवालातून दिसून येत आहे.
स्पोकन इंग्लिश योजनेतील शाळांची संख्या घटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:44 AM
गतवर्षी स्पोकन इंग्लिशचा उपक्रम ४३८ शाळांमध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी मात्र स्पोकन इंग्लिशसाठी ई-लर्निंग वापर करण्यासोबतच तासिका घेणार्या शाळांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ८१ शाळांमध्येच ई-लर्निंगचा वापर करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ठळक मुद्देटार्गेट अपूर्ण : केवळ ८१ शाळांमध्येच ई-लर्निंगचा वापर