अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागातील बंधपत्रित परिचारिकांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी शासनाकडून रविवार, १७ जुलै रोजी घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेवर अकोला मंडळाअंतर्गत येणार्या पाच जिल्हय़ातील ५१२ पैकी ३९३ परिचारिकांनी बहिष्कार टाकला. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत परिचारिकांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन केले व मागणीचे निवेदन प्रशासनाला सोपविले. दरम्यान, या परिचारिकांपैकी ११९ परिचारिकांनी रविवारी घेण्यात आलेली परीक्षा दिली.सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील बंधपत्रित परिचारिकांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी शासनाने त्यांची विभागांतर्गत सरळसेवा भरती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मात्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन या बंधपत्रित परिचारिकांच्या संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. शासन सेवेत अखंडित २५ ते ३0 वर्षे सेवा दिल्यानंतर आता अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयाला विरोध करीत ही परीक्षा रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यासाठी निवेदन, आंदोलन, निदर्शने करण्यात आली; परंतु परीक्षा रद्द करण्यात आली नाही. त्यामुळे या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्यानुसार अकोला येथे रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत पाच जिल्हय़ातून आलेल्या ५१२ परिचारिकांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन केले व मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर मात्र या परिचारिकांपैकी ११२ परिचारिकांनी परीक्षा दिली. उर्वरित ३९३ परिचारिका मात्र परीक्षा न देताच माघारी परतल्या.
परिचारिकांचा परीक्षेवर बहिष्कार!
By admin | Published: July 18, 2016 2:19 AM