अकोला: जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजेच जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात नोटीफिकेशन जारी करण्यात आले असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी हा बेसिक अभ्यासक्रम असून, हमखास रोजगाराची संधी देणारा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर या अभ्यासक्रमाकडे वळतात. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी. परंतु १४ मार्च रोजी इंडियन नर्सिंग काउन्सिलतर्फे नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून, त्यानुसार हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराच्या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाकडे बघणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार आहे. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष या अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नाही.ट्रेनिंग प्रोग्राम बंद झाला तर...‘जीएनएम’ या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रुग्णाची काळजी कशी घ्यायची, या संदर्भात साध्या गोष्टी शिकवल्या जातात. याशिवाय ग्रामीण भागात जाऊन कशी सुविधा द्यायची, याचेदेखील प्रशिक्षण दिले जाते. बीएससी नर्सिंग अंतर्गत या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. याशिवाय बीएससी नर्सिंगची डिग्री असलेल्या नर्स ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्यास नकार देतात. शिवाय, बहुतांश परिचारिका खासगी रुग्णालयात सेवा देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद झाल्यास थेट ग्रामीण भागावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.हा बेसिक अभ्यासक्रम असला, तरी रोजगाराची हमी देणारा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी याकडे वळू लागले आहेत; परंतु हा अभ्यासक्रम बंद झाल्यास विद्यार्थ्यांसोबतच आरोग्य सेवेचे मोठे नुकसान होईल.- सविता राठोड, प्राचार्य, शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, अकोला