गत खरीप हंगामात बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाला. यंदाही कपाशीवर बोंडअळीचे संकट आहे. आतापर्यंत मोजक्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे सध्याचे दिवसाचे तापमान ३३ अंश सेल्सिअस व आर्द्रता ७५ टक्केपर्यंत पोहोचली आहे. पोषक वातावरणामुळे कापाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रादुर्भाव वाढण्याअगोदरच प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या (न उमलणारी कळी) नियमित शोधून अळीसह नष्ट केल्यास पुढील पिढ्यांची वाढ थांबवता येईल, असे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र...
१,५५,६८७ हेक्टर
झालेली पेरणी...
१,४०,५४७ हेक्टर
पिकाच्या उंचीवर फेरोमन सापळे एकरी ५ लावावेत. कामगंध वड्या (ल्यूर) २१ दिवसांनंतर बदलणे आवश्यक आहे. तसेच ट्रायकोकार्ड पानाखाली १० दिवसांच्या अंतराने ७-८ वेळा एकरी ३ चिकटवावे. सापळ्यात सतत ३ दिवस ८ ते १० नर पतंग आढळल्यास प्रथम नष्ट करावेत. प्रादुर्भाव ५ टक्केच्या वर आढळल्यास प्रभावी नियंत्रणाकरिता प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मि.लि. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मि.लि. किंवा क्लोरॅट्रानिलिप्रोल १८.५ टक्के ३ मि.लि. किंवा इंडोस्काकार्ब १८.५ टक्के १० मि.लि. यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- डॉ. विनोद खडसे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंदेकृवि, अकोला