संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील शहराला लागूनच असलेले किमान दहा हजार लोकसंख्या असलेले सिरसो गाव. आतापर्यंत या गावाने ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले. आतापर्यंत एवढे जिल्हाधिकारी होणारे एकही गाव या विभागात सापडणे अवघडच आहे. एवढेच नव्हे तर सद्यस्थितीत विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून अनेक जण कर्तव्य बजावत आहेत.
मूर्तिजापूरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात प्राथमिक शिक्षणासाठी केवळ सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा, सर्वांनीच शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे जावे लागते. शहरातही माध्यमिक शिक्षणासाठी बोटावर मोजण्याइतक्याच शाळा होत्या. सिरसो येथून कितीतरी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सहा किलोमीटर ये-जा करणे, अशी बारा किलोमीटरची पायपीट करावी लागत असे, अशा परिस्थितीतही या गावचे विद्यार्थी घडले. आतापर्यंत या गावाने ६ जिल्हाधिकारी, ४ तहसीलदार, ३ गटविकास अधिकारी दिले, एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय ऊर्फ बाळासाहेब मेहरे हेसुद्धा याच गावचे आहेत. आतापर्यंत या गावातून ७४ अधिकारी झाले असून, सद्यस्थितीत ७८ एवढे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत आतापर्यंत २०७ लोकांनी कर्तव्य बजावले आहे. याच धर्तीवर 'सिरसोचे मातब्बर' विजय हरणे संपादित एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले असून, या पुस्तकात कर्मचारी ते जिल्हाधिकारी व पदाधिकारी यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
------------------
हे झाले जिल्हाधिकारी, तहसीलदार
भगवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), जयवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), राजाभाऊ देशमुख(जिल्हाधिकारी), बलदेवसिंह हरणे (निवासी उपजिल्हाधिकारी), पंजाबराव वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), दिनेश वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), गणपतराव मेहरे (तहसीलदार), पूजा माटोडे(हरणे)(तहसीलदार), मुकुंदराव अंबाडे (तहसीलदार), देवराव इंगळे(तहसीलदार)
------------------------
‘कलेक्टरचे गाव’ ही वेगळी ओळख
सिरसो या गावात आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात अनेक अधिकारी घडले आहेत, परंतु एकेकाळी या गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत ६ जिल्हाधिकारी या गावाने दिल्याने ‘कलेक्टरचे गाव’ म्हणून या पंचक्रोशीती ओळखले जायचे, ही ओळख आजही कायम आहे.