लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे व राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ७ मार्च रोजी दिला. त्यानुसार सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश संबंधित सदस्यांना ८ मार्च रोजी तहसीलदारांकडून बजावण्यात येणार आहे. ‘ओबीसी’ प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केव्हा होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत देण्यात आलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन, पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याचा आदेश राज्य निवडणूक निवडणूक आयोगाने ५ जानेवारी रोजी दिला. त्यानुषंगाने ‘ओबीसी’ प्रवर्गातून निवडून आलेले अकोला जिल्हा परिषदेचे १४ सदस्य आणि तेल्हारा पंचायत समिती वगळता अकोट, मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी व पातूर या सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेेंंद्र पापळकर यांनी ७ मार्च रोजी दिला. सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश संबंधित सदस्यांना बजावण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संबंधित तहसीलदारांना दिला. त्यानुसार सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या ओबीसी प्रवर्गातील संबंधित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांच्या सदस्यांना ८ मार्च रोजी सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश संबंधित तहसीलदारांकडून बजावण्यात येणार आहे. ‘ओबीसी’ प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होतो, याकडे आता जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तीन सभापतींसह एका उपसभापतींना आज सोडावा लागणार पदभार!
‘ओबीसी’ प्रवर्गातील जिल्हा परिषदेचे १४ सदस्य व सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे यांच्यासह अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे व उपसभापती रिता ढवळी यांचाही समावेश आहे. सदस्यत्व रद्द झाल्याने संबंधित तीन सभापती व एका उपसभापतींना सोमवारी पदभार सोडावा लागणार आहे.