अकोला : वृषभराजाचा सण पोळा शुक्रवारी अकोला शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला. पोळा चौकात भरलेल्या पारंपरिक पोळ्यात उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा आणि शेतकरी सन्मान साेहळ्यात सर्जा-राजाला वंदन करीत बळीराजाचा सन्मान करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षानंतर यंदा अकोला शहरात पोळा उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळी शहरातील जुने शहरस्थित पोळा चौकात पारंपरिक पध्दतीने पोळा भरविण्यात आला. वाजत गाजत शहरातील विविध भागांतून बैलजोड्या पोळ्यात सहभागी झाल्या होत्या. या पोळ्यात संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्थेच्यावतीने शेतकरी सन्मान सोहळा व उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा घेण्यात आली. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शाैकतअली मिरसाहेब, कृष्णा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार राजीव पिसे, पुरुषोत्तम पाटील आवारे, प्रसिध्द कवी ॲड. अनंत खेळकर, आयोजक अनिल मालगे आदी उपस्थित होते. बैल हा श्रमसंस्कृतीचे वाहक व प्रतीक आहे त्यामुळे घरातील नाठाळ मुलांना बैल संबोधून बैलाच्या श्रमाचा अवमान करू नका अशी सूचना अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात केली. याप्रसंगी उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या बैलजोडीच्या बळीराजांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पोळा फुटल्यानंतर बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोळा चौकात शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच परिसरात विविध साहित्य आणि खेळण्यांची दुकाने थाटली होती. पोळ्यानिमित्त परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गोपाल मांडेकर यांची बैलजोडी प्रथम
संत गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत जुने शहरातील शेतकरी गोपाल मांडेकर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. खिडकीपुरा भागातील साजिद खान शहादत खान यांच्या बैलजोडीने व्दितीय आणि शिवाजी नगरमधील वसीम खान नासीर खान यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला. तर लाइक खान, नामदेव वानखडे व रमेश भगत यांच्या बैलजोड्यांना प्रोत्साहपर बक्षीस जाहीर करण्यात आले.