- प्रवीण खेते
अकोला: शेगाव-कालखेड मार्गावर शुक्रवारी झालेल्या एका अपघातात लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी बापाचा उपचारादरम्यान अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांचाही अंत्यविधी सोबतच करण्याची कुटुंबीयांसह गावकऱ्यांची इच्छा होती, पण डॉक्टरांकडून शवविच्छेदनास टाळाटाळ होत असल्याने मृत्यूनंतरही बापलेकाच्या भेटीला मोठा अडसर निर्माण झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने रात्री उशिरा शवविच्छेदन झाले अन् रात्री उशिरा बाप-लेकाच्या अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला.
संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव येथील रहिवासी युवराज भिकाजी खोंड (३७) हे शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी आपल्या पाच वर्षीय मुलासोबत दुचाकीने शेगावकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर वडील युवराज खोंड हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकाेल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी ५ वाजताच्या सुमारास युवराज खोंड यांचा मृत्यू झाला. दरम्यान शेगाव येथे मुलाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. बाप-लेकाचा अंत्यविधी सोबतच करावा म्हणून गावात तयारीही सुरू झाली; पण अकोला सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांकडून सायंकाळी शवविच्छेदनास टाळाटाळ करण्यात आली. डॉक्टरांच्या आडकाठीमुळे मृत्यूनंतरही बाप-लेकाच्या भेटीस अडसर निर्माण झाल्याने नातेवाईकही हताश झाले होते. सामाजिक कार्यकर्ते पराग गवई आणि नीलेश काळंके यांच्या मदतीने हा प्रकार उप-जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, प्र.अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. दिनेश नैताम यांच्यापर्यंत पोहोचला अन् त्यांच्या मध्यस्थीने शुक्रवारी रात्री उशिरा शवविच्छेेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली.
संवेदनाही मेल्यात का?
बापलेकाच्या अंत्यविधीसाठी अख्ख गाव रात्री उशिरापर्यंत जागं होतं; पण रात्र झाल्याने शवविच्छेदनास नकार देणाऱ्या डॉक्टरांच्या संवेदना मेल्यात का, असा सवाल हताश झालेल्या नातेवाइकांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केला.
या घटनेवरून माणुसकी जिवंत राहिली नसल्याचा प्रत्यय येतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी.
- पराग गवई, सामाजिक कार्यकर्ता.