अकाेला : पातूर तालुक्यातील खेट्री येथील कॅनॉलचे पाणी संगनमताने अडवून कॅनॉलचे नुकसान करणाऱ्या खेट्री येथील तिघा आरोपींविरुद्ध चान्नी पोलिसांनी १३ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला.
संगनमताने कॅनलवरील शेत रस्ता गेल्या अडीच महिन्यांपासून गैरकायदेशीररीत्या अडविला होता. त्यामुळे शेतीची कामे रखडली होती. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट प्रकल्प विभाग व पातूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर १२ सप्टेंबर रोजी पातूर तहसीलदार रवींद्र काळे यांनी अडीच महिन्यांपासून अडविलेला रस्ता पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मोकळा केला. कॅनॉलमध्ये सिमेंटच्या तुमड्यामध्ये रेती भरून कॅनालमध्ये टाकून पाणी अडवून कॅनॉल फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश सुरेश सांगळे यांच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी महादेव डहाळे, संतोष महादेव डहाळे, सचिन कृष्णा पठाडे यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास चान्नी ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.