अकोला : उपनिबंधक कार्यालयाच्या सहकार विभागाने सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित यांना १५ दिवसांच्या आत संबंधित संस्थेचा रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश दिला होता; परंतु संस्थेकडून रेकॉर्ड सादर न केल्याने सहकार विभागाने संस्थेच्या नऊ संचालक मंडळाविरुद्ध जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशोक पांडुरंग भगत, सिद्धार्थ शत्रुघ्न मुंडे, सुरेश गणपत इंगळे, गौतम शंकरराव मुंडे, लक्ष्मण नारायण इंगळे, विलास प्रकाश सावळे, सूचिता राजेश इंगळे, गवळण प्रकाश सावळे व शत्रुघ्न शंकर मुंडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.महाविभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांनी सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित रजि. नं. १०५४ या संस्थेला सहकार विभागाने १५ दिवसांच्या आत रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश दिला होता; परंतु पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही या संस्थेने सहकार विभागाला रेकॉर्ड सादर न केल्यामुळे या संस्थेच्या संचालक मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. गुन्हे दाखल करण्यासाठी सहकार अधिकारी श्रेणी-२ दीपक वामनराव सिरसाट यांनी जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.यानुसार संचालक मंडळावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १४६ ग, १४७ आणि १४७ ग अन्वये गुन्हे दाखल करण्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळातील अशोक पांडुरंग भगत, सिद्धार्थ शत्रुघ्न मुंडे, सुरेश गणपत इंगळे, गौतम शंकरराव मुंडे, लक्ष्मण नारायण इंगळे, विलास प्रकाश सावळे, सूचिता राजेश इंगळे, गवळण प्रकाश सावळे, शत्रुघ्न शंकर मुंडे सर्व राहणार सिद्धार्थवाडी बायपास यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अशाप्रकारची सहकार विभागाने ही पहिलीच कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.