अकोला - पारस येथील कृष्णविहार या नावाने असलेल्या १८ डुप्लेक्समधील कल्पना मधुकर पवार यांच्या मालकीचे ८ अ क्रमांकाच्या डुप्लेक्सचे खोटे व बनावट दस्तावेज तयार करून सदर डुप्लेक्सवर गैरकायदेशीर ताबा करून त्याची विक्री करणाºया पारस येथील पाच जनांविरुध्द बाळापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक भरत रुपारेल यांनी पारस येथे कृष्णविहार नावाने १८ डुप्लेक्स आणि १२ दुकाने बांधलेली आहेत. या १८ डुप्लेक्समधील ८ अ क्रमांकाचे खालच्या भागाचे डुप्लेक्स अकोल्यातील लहाण उमरी येथील रहिवासी कल्पना मनोहर पवार यांनी व मनोहर पवार या दाम्पत्याने १३ डिसेंबर २०१७ रोजी खरेदी केले आहे. मात्र याच ठिकाणी रहिवासी असलेले विजय बाळकृष्ण इंगोले, बाळकृष्ण गणपतराव इंगोले, मंगला बाळकृष्ण इंगोले, सदानंद विलास सदांशिव व आशीष अशोक वानखडे या पाच जनांनी कल्पना पवार यांच्या डुप्लेक्सवर बेकायदेशीररीत्या ताबा करून खोटे दस्तावेज तयार केले आणि पवार यांना खंडणी मागीतली. त्यानंतर कल्पना पवार यांच्या ८ अ डुप्लेक्सच्यावरील डुप्लेक्स हे इंगोले कुटुंबीयांच्या मालकीचे असून खालचे डुप्लेक्सही त्यांनाच देण्याची मागणी सदानंद सदाशिंव व इंगोले कुटुंबीयांनी पवार यांच्याकडे केली. यावर कल्पना पवार यांनी होकार देउन डुप्लेक्स विक्री करण्यासाठी सहमती दर्शवीली. त्यानुसार ८ अ आणि ८ ब ची इसार पावती इंगोले यांच्या नावाने करून दिली. मात्र त्यानंतर इंगोले कुटुंबीयांनी खरेदी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ८ अ या खालच्या डुप्लेक्सला कल्पना पवार यांनी कुलुपबंद करून ते अकोल्यात स्थायीक झाले. त्यावर बराच कालावधी उलटल्याने पवार दाम्पत्य सदानंद सदाशिंव यांच्याकडे ३१ जुलै रोजी गेले आणि त्यांनी इंगोले कुटुंबीय खरेदी घेणार की नाही या संदर्भात विचारणा केली. यावेळी पवार यांचे डुप्लेक्स उघडे दिसल्याने हे दाम्पत्य त्यांच्या डुप्लेक्समध्ये गेले असता या ठिकाणी इंगोले कुटुंबीय बेकायदेशीरीत्या राहत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी दस्तावेजांची तपासणी केली असता सदर डुप्लेक्सचे बनावट दस्तावेज तयार करून खोटया स्वाक्षरीव्दारे त्यावर ताबा केल्याचे उघडकीस आले. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कल्पना पवार यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर पाच जनांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०,४५२,४६८,४७१,३४नुसार गुन्हा दाखल केला आहे.