- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये अकोला शहरातील बेघर व गरजूंना मोफत भोजन वितरित करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सोमवारी अशोक वाटिका परिसरातील रस्त्याच्या कडेला आईच्या कडेवर असलेल्या एका चिमुकलीच्या तोंडात अन्नाचा घास भरवून निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नीलेश अपार यांनी माणुसकी जपल्याचा प्रत्यय दिला. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये अकोला शहरातील विविध भागात असलेल्या बेघर, गोरगरीब, गरजू व्यक्तींना मोफत भोजन वितरित करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता कक्षामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सोमवार, ६ एप्रिल रोजी सर्वोपचार रुग्णालय ते अशोक वाटिका या भागात बेघर व गरजूंना मोफत भोजन वितरित करण्यात आले. त्यावेळी अशोक वाटिका परिसरात रस्त्याच्या बाजूला एका बेघर आईच्या कडेवर असलेल्या चिमुकलीला अन्नाची गरज असल्याचे ओळखून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आणि अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांनी त्या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या तोंडात अन्नाचा घास भरविला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, सामाजिक कार्यकर्ता पराग गवई उपस्थित होते. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत बेघर आईच्या कडेवर भुकेलेल्या चिमुकलीच्या तोंडात अन्नाचा घास भरऊन आणि तिच्या आईला भोजन वितरित करून, जिल्हा प्रशासनातील या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यातील माणुसकीचा प्रत्यय करुन दिला.
शैक्षणिक गुणवत्ता कक्षातर्फे गरजूंना मोफत भोजन वितरण!‘लॉकडाऊन’च्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाच्यावतीने अकोला शहरातील विविध भागात रस्त्यांवर, मंदिर परिसर आणि इतर ठिकाणी असलेल्या बेघर, गरजू व्यक्तींना मोफत भोजन वितरित करण्यात येत आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले व त्यांच्या पथकामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.