तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, कामाचा वेग मंदावला आहे. ठोस निर्णय न घेता केवळ दैनंदिन कामकाज करून अधिकारी मोकळे होत असल्याने अनेक कामांना ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील विविध विभागांतील अनेक पदे रिक्त असून, कार्यालयीन प्रमुखपदेसुद्धा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयातील तहसीलदारपदसुद्धा रिक्त असून नायब तहसीलदार यांच्याकडे पदभार आहे. ग्रामीण भागाचा विकास तसेच विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम तालुका स्तरावरील पंचायत समितीचे असून या कार्यालयातील तर अनेक पदे रिक्त असून गटविकास अधिकारी यासारखे मुख्य पद गतवर्षापासून रिक्त आहे, तर या पदाचा प्रभारही कृषी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. शहराच्या विकासाकरिता व जनतेच्या आरोग्यविषयक तसेच विविध योजनांचा लाभ देण्याकरिता नगरपरिषद आहे. मात्र येथीलसुद्धा अनेक पदे रिक्त आहेत. मुख्य पद असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली असून, त्यांचा प्रभार बाळापूर न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हिवरखेड येथील ठाणेदारांची बदली झाली असून, अकोट येथील अधिकाऱ्याकडे प्रभार आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्य उपअधीक्षक पदसुद्धा रिक्त असून त्या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास अधिकारी हे पद रिक्त असून, या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्यांकडे दिला असून, या कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी हे पदसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त असून, विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे.
...............................
अधिकाऱ्यांना तेल्हारा तालुक्याची ॲलर्जी
तेल्हारा हे ठिकाण जिल्ह्याच्या ठिकाणाहून लांब अंतरावर असून, रात्री-बेरात्री दळणवळणाची साधने उपलब्ध हाेत नाहीत. रस्त्याची समस्यासुद्धा बिकट आहे. येथील स्थानिक राजकारणाचासुद्धा अनेक अधिकारी धसका घेत असल्याने तेल्हाऱ्याला पसंती देण्यास कोणीही अधिकारी धजावत नसल्याची चर्चा अधिकारी वर्गात हाेताना दिसून येत आहे.
......................................
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
पालकमंत्री बच्चू कडू यांचे या तालुक्यावर विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथील नागरिक त्यांच्याकडे कुठलीही समस्या हक्काने घेऊन जातात, परंतु या समस्येकडे पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अधिकारी वर्गाचा बॅकलॉग भरून काढावा, जेणेकरून तालुक्याच्या कामाला गती मिळेल, अशी मागणी जाेर धरत आहे.