अकोला : महावितरणची आर्थीक परिस्थिती वाईट असताना अकोला परिमंडळाअंतर्गत गेल्या दहा महिन्यातील घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे असलेली २१४ कोटी थकबाकीची शंभर टक्के वसूली २८ फेब्रुवारीपर्यंत करावी लागेल अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने अकोला,बुलढाणा व वाशिम जिल्ह्याचे अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व सर्व कार्यालयीन कर्मचारी वसूलीसाठी बाहेर पडणार आहेत. मुख्य अभियंता स्वत: वसूलीसाठी अनपेक्षीत ठिकाणी भेटी देणार असून दररोज कारवाईबाबत आढावाही घेणार आहेत. ठराविक वेळेत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य अभियंता अनिल डोये यांनी संबंधितांना बुधवारी व्हिसीद्वारे दिले. राज्यातच नाही तर अकोला परिमंडलालगत असलेल्या सर्व महावितरण कार्यालयाच्या थकित वीज बिल वसूलीला गती मिळाली, मात्र अद्याप अकोला परिमंडलाअंतर्गत वसूली ढेपाळलेली आहे. १२ फेब्रुवारी मुंबई येथे झालेल्या सर्व मुख्य अभियंता यांच्या आढावा बैठक झाली. त्यात अकोला परिमंडलाला कोणतेही कारण न देता २८ फेब्रुवारीपर्यंत थकित वसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. उद्दीष्ट पुर्ण न झाल्यास कारवाईला निश्चितच सामोरे जावे लागणार असल्याचेही मुख्य अभियंतांनी यावेळी सांगीतले.
अशी आहे थकबाकी
अकोला जिल्ह्यात ८३ कोटी ( अकोला ग्रामीण ३२ कोटी,अकोला शहर-२७ कोटी,अकोट- २४ कोटी,), बुलढाणा जिल्हयात १०२ कोटी(बुलढाणा विभाग ३४ कोटी,खामगाव विभाग-३८ कोटी,मलकापुर ३० कोटी),आणि वाशिम जिलह्याची २९ कोटी अशी एकून २१४ कोटीची थकबाकी अजूनही थकित आहे.