लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी दर महिन्याच्या कार्यालयीन पहिल्या दिवशी एक दिवस सायकलवर कार्यालयात येणार आहेत. यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी काढला.वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाहनांच्या वापरात वाढ झाली असून, वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणातही वाढ होत आहे. या पृष्ठभूमीवर पर्यावरणाचे रक्षण आणि खनिज संपत्ती इंधन बचतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी दर महिन्याच्या कार्यालयीन पहिल्या दिवशी ‘सायकल’द्वारे कार्यालयात जातील आणि कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर सायकलद्वारेच घरी परतणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी २० जुलै रोजी परिपत्रक काढून दर महिन्याच्या कार्यालयीन पहिल्या दिवशी ‘सायकल दिवस’ पाळण्याचा आदेश अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी दर महिन्यात एक दिवस सायकलवर कार्यालयात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक पाऊल ठरणार आहे.
अधिकारी-कर्मचारी एक दिवस ‘सायकल’वर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:34 AM